सेंद्रिय शेती - सुद्रुढ शेतीचा खरा मार्ग

Jimcy Rajan

May 23, 2017

Agriculture

सेंद्रिय शेती – सुद्रुढ शेतीचा खरा मार्ग

Share

एके काळी भारताला “सोने कि चिडिया ” म्हटले जाई. असा आपला गौरवाने उल्लेख केला जात असे कारण भारत आधी पासून कृषी प्रधान प्रदेश आहे. संपन्नतेचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणजे सोने.

भारतातील संपूर्ण शेती पद्धती वैदिक (नैसर्गिक) ज्ञानाचा वापर करून हवामानाच्या शक्यतांचा अभ्यास करून, आणि देशी बियाणांचा वापर करीत पर्यावरण संतुलित राहील अशा पद्धतीने केली जात होती.

परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येला लागणाऱ्या अन्नामुळे देशामध्ये अन्नधान्याची समस्या उभी राहिली त्यामुळे हरित क्रांती (१९६७ – १९७८ ) मुळे दरडोई उत्पादकता वाढवण्यात आली आणि हायब्रीड -संकरित बियाणे जन्माला आले आणि सिंचनाच्या सोयी यामधून शेतीची क्रांती झाली.

परंतु हायब्रीड बियाण्यांमुळे कीटकनाशकांची गरज आणि रासायनिक खतांची गरज जास्त पडू लागली.

औषधांच्या आणि रासायानांच्या अती वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. जमिनीतील सूक्ष्म-जैविक घटकांचा नाश झाल्याने जमिनी नापीक होऊ लागल्या.

पर्यायाने खतांची कार्यक्षमता कमी झाली. या जमिनींच्या कमी कार्यक्षमतेमुळे रासायनिक खतांचा पुन्हा वापर खूपच वाढला आणि ह्या अश्या चक्रव्यूहात अजूनपण अधुनिक शेती अडकलेली आहे.

शेतीमध्ये कीटकनाशकांचा भरमसाठ व अनिर्बंध वापरामुळे मित्र किड्यांचा नाश झाला व शत्रू किड्यांमध्ये कीटकनाशकांना प्रतिकार करायची क्षमता वाढली.

हायब्रीड बियाणे नवनवीन किडे व रोगांना बळी पडू लागली. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या बेसुमार वाढलेल्या किमती, या सगळ्यांचा परिणाम म्हणजे एकूण उत्पादन खर्च वाढला आणि त्या प्रमाणात उत्पादकता न वाढल्यामुळे शेती तोट्याची झाली.

याशिवाय कीटकनाशकांच्या अन्नात राहणाऱ्या अंशामुळे विषारी अन्नाचा पुरवठा होऊन आरोग्यावरही परिणाम झाला.

आज भारतीय शेती व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सेंद्रिय शेती हाच खरा व शाश्वत पर्याय आहे पण यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःवर विश्वास आणि शेती व्यवस्थेवर श्रद्धा ठेवायला पाहिजे सेंद्रिय शेतीत उत्पादन घेणे अवघड आहे पण अशक्य नाही.

जास्त उत्पादनाची अपेक्षा न करता उत्पादन खर्चातील बचतीतून वाढलेला नफा या मुद्यावर विचार होणे गरजेचे आहे.

सूक्ष्मजीव सजीवांची मृत शरीरे व अवयव यांना कुजवून त्यातून अलग होणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये वानस्पतींना उपलब्ध करून देतात या शृंखलेला सेंद्रिय पद्धती म्हणतात.

तसेच सेंद्रिय शेतीत बाहेरून विकत घेऊन काहीही टाकावे लागत नाही, पिकांच्या वाढीसाठी लागणारे सर्व अन्नघटक शेतातच नैसर्गिकरित्या उपलब्ध करून द्यायचे असतात.

या मुळे शेतीचा उत्पादन खर्च हा निम्म्यापेक्षा कमी करता येतो. अर्थात शेतीचा उप्तादन खर्च कमी करणे हा पहिला उद्देश असून नंतर उत्पादनातही वाढ व्हावी हा दुसरा उद्देश.

थोडा संयम, अभ्यास, चिकाटी, व प्रयोगांद्वारे हे सहज साध्य करता येते.

Also Read

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *